मुघल बादशाह ‘शहाजहान’ जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने सगळ्यात पहिले ‘हुगळी’ येथे असणाऱ्या पोर्तुगीजांवर हल्ला केला. याला कारण होते ते म्हणजे शहाजहानची राणी ‘मुमताजमहल’ हिच्या दोन दासी पळविल्या होत्या. यासाठी मुघल बादशाह ‘शहाजहान’ याने त्याच्या ‘कासीमखान’ या सेनापतीस पोर्तुगीजांवर पाठविले. ‘कासीमखान’ हा जेव्हा तिथे पोहोचला आणि त्याने पोर्तुगिजांवर हल्ला केला तेव्हा जितक्या वेळ लढता येईल तेवढे पोर्तुगीज लढले परंतु त्यांना जेव्हा कळले की मोगलांच्या पुढे आपण जास्त टिकाव धरू नाही शकणार तेव्हा त्यांनी शरणागती पत्करली.
जेव्हा पोर्तुगीज शरण आले तेव्हा ‘कासीमखान’ याने शरण आलेल्या ५००० हजार पोर्तुगीजांना कैद केले. या कैद केलेल्या पोर्तुगिजांच्या मध्ये ‘ऑगस्टीनियन’ आणि ‘जेसूईट’ पंथाचे पाद्री हे देखील होते. हे सगळे पकडलेले पोर्तुगीज लोक ‘कासीमखान’ याने राजधानीला पाठवले. ‘हुगळी’ गाव गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. या नदीमधून पोर्तुगीज पळून सुद्धा जाऊ शकत नव्हते. कारण नदीच्या पाण्याने तळ गाठला होता त्यामुळे कैदी नेणाऱ्या होड्या गाळात रुतून पडल्या होत्या.

हे कैदी ‘शहाजहान’ याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत याचदरम्यान शहाजहानची राणी ‘मुमताजमहल’ हिचा मृत्यू होतो (६ जुलै १६३२). आग्र्याला राजवाड्यासमोर तिची कबर बांधण्याचा हुकूम ‘शहाजहान’ देतो. ‘ताजमहाल’ बांधायला ‘शहाजहान’ खूप पैसे खर्च करण्याचे ठरवतो. जेव्हा ताजमहालचे दोन मजले बांधून होतात त्याच्यानंतर ताजमहालाच्या तळमजल्यावर त्याच्या लाडक्या पत्नीला दफन केले जाते. हे ‘मुमताजमहालाचे’ थडगे कोणालाही पाहता येत नसे. याचे मुख्य कारण हे की या थडग्याचा सुरक्षेसाठी ‘शहाजहान’ याने स्त्रिया आणि खोजे यांची नेमणूक केलेली होती.

जर ‘मुमताजमहाल’ हिच्या हयातीत हे पकडलेले पोर्तुगीज जर दरबारात पोहोचले असते तर ‘मुमताजमहल’ हिने तिच्या दासी पळविल्या म्हणून पोर्तुगीजांचे छळ करून तुकडे तुकडे केले असते. कारण ‘मुमताजमहल’ हिने अशी शपथ घेतली होती. तरीही पोर्तुगीजांचे मात्र नशीब खराब होते ते शिक्षेमधून सुटले नाहीत.जिवाच्या भीतीने किंवा आपल्या बायका दुसऱ्यांच्याकडे जाऊ नये म्हणून काही पोर्तुगीज लोकांनी स्वतःचा धर्म बदलला. यातील बऱ्याचश्या पोर्तुगीजांच्या बायका या ‘शहाजहान’ याने आपल्या सैनिकांमध्ये वाटून टाकल्या. तर ज्या सुंदर पोर्तुगीज स्त्रिया होत्या त्यांना ‘शहाजहान’ याने आपल्या खाजगी जनानखान्यामध्ये टाकले.
यामध्ये मात्र जे पोर्तुगीज पाद्री होते त्यांनी मात्र चिकाटी दाखवली ते आपल्या धर्माला चिकटून राहिले. त्यांनी ‘शहाजहान’ याला सांगितले आम्ही काही झाले तरी आमचा धर्म सोडणार नाही. या पाद्री लोकांची सुटका ही दरबारात एक ‘आर्मेनियन’ होता त्याच्यामुळे सुटका झाली. तसेच ‘हिरोनेमो व्होरानको’ नावाचा व्हेनिस येथील रहिवासी होता. त्याला पोर्तुगीजांनी सोडविले होते त्याचे ऋण ठेवून त्याने काही पोर्तुगीज लोकांची सुटका केली. याच्यानंतर हे मुघलांच्या तावडीतून सुटलेले सगळे पोर्तुगीज आग्र्यामध्ये राहू लागले.
______________________________________________________________________________________________
संदर्भग्रंथ:-
१. Storia do Mogor: Niccolao Manucci.
२. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास:- डॉ. ब. प्र. सक्सेना अनुवाद डॉ.भ.ग.कुंटे.महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, १९८२.
______________________________________________________________________________________________
