चापेकर बंधूंचा पुण्यातला पराक्रम सर्वाना माहिती आहेच परंतु मुंबई मध्ये सुद्धा त्यांनी एक पराक्रम केला होता. त्यांच्या आत्मवृत्तामध्ये ही घटना आली आहे.
मुंबई मध्ये इंग्रजांची राणी क्वीन विक्टोरिया हिचा सिंहासनावर बसवलेला पुतळा होता. सन १८७२ मध्ये बसवलेला हा पुतळा मॅथ्यु नोबेल यांनी तयार केला होता तर बडोद्याचे गायकवाड यांनी तो भेट म्हणून दिला. होता. आठ फूट आणि सहा इंच उंच असा तो संगमरवरी पुतळा होता. सुरुवातीला विक्टोरिया गार्डन मुंबई येथे त्याचे अनावरण झाले आणि नंतर तो esplanade Road किंवा सध्याच्या महात्मा गांधी रस्ता येथे हलवला गेला.


इंग्रजांनी १८५७ चे बंड मोडून काढले म्हणून चापेकर बंधूना कोणत्यातरी प्रकारे सूड उगवायचा होता. म्हणून या मुंबईतील राणीच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे त्यानी ठरवले. त्यासाठी त्यांनी सहा आण्याचे डांबर लावले व त्यात हरभऱ्याचे पीठ मिसळले. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी हा पराक्रम करण्याचे ठरविले होते. रात्री दोनच्या सुमारास जाऊन राणीच्या तोंडावर त्यांनी डांबर फासून चेहरा विद्रूप केला आणि नाक कापले. तसेच गळ्यात एक माळ अडकवली.
सकाळी हा हा म्हणता ही बातमी गावभर झाली आणि लोकं तो पुतळा बघण्यास गेले. चापेकर बंधू सुद्धा त्या गर्दीत जाऊन मजा बघत होते. तिथे असणारी पोलीस मंडळी पाण्याने ते डांबर काढण्यात गुंतली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो पुतळा भाऊ दाजी लाड संग्रहालयात ठेवला गेला.

संदर्भ – दामोदर हरी चापेकर यांचे आत्मवृत्त

🙏👌