• आम्ही कोण?
  • संपर्क
Sunday, April 5, 2026
  • Login
School of Indian History
  • मुखपृष्ठ
  • भारताचा इतिहास
    • प्रागैतिहासिक भारत
    • प्राचीन भारत
    • मध्ययुगीन भारत
    • ब्रिटिशकालीन भारत
  • इंग्रजी लेख
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • भारताचा इतिहास
    • प्रागैतिहासिक भारत
    • प्राचीन भारत
    • मध्ययुगीन भारत
    • ब्रिटिशकालीन भारत
  • इंग्रजी लेख
  • संपर्क
No Result
View All Result
School of Indian History
No Result
View All Result
बेगम बडी साहिबा - छत्रपती शिवाजी या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटात ललिता पवार यांनी साकारलेली भूमिका

ऑपरेशन बडी साहिबा : सतराव्या शतकात इंग्रजांनी केलेला एक धाडसी ‘किडनॅप प्लॅन’ !

schoolofindianhistory by schoolofindianhistory
September 25, 2020
in मध्ययुगीन भारत

बेगम बडी साहिबा किंवा बडी साहेबीण हे नाव आपण ऐकलं असेल ना ? निदान मराठी लोकांना तरी हे नाव चांगलेच परिचयाचे आहे ! हो बरोब्बर ओळखलंत ! बडी साहिबा म्हणजे तीच विजापूरची राणी , शिवाजी महाराजांना जिवंत अथवा मृत विजापूरच्या दरबारात हजर करण्यासाठी अफझलखानाला महाराजांवर पाठवणारी . अशा या महाकारस्थानी आणि दक्खनमध्ये दरारा असलेल्या बडी साहिबा चे अपहरण करण्याचा ‘प्लॅन’ आपण बनवू हे इंग्रजांना आणि आपल्यावर असा काही प्रसंग ओढवेल हे खुद्द बड्या साहेबीणीला स्वप्नात देखील वाटले नसेल ! परंतु इंग्रजांनी अशा तऱ्हेचा एक ‘प्लॅन’ तयार केला होता हे आपल्याला समकालीन इंग्रजी पत्रांवरून लक्षात येते . चला पाहूया , नेमके काय होते हे प्रकरण.

इंग्रजांच्या धाडसी ‘प्लॅन’ ची पार्श्वभूमी

इ.स. १६६१ च्या मार्च महिन्यामध्ये शिवाजी महाराजांनी राजापूरची इंग्रजांची वखार लुटली आणि तिथल्या काही इंग्रजांना कैद केले. हे इंग्रज पुढीलप्रमाणे होते :-

१) हेन्री रेव्हिंग्टन २) रँडॉल्फ टेलर ३) रॉबर्ट फेर्रान्ड ४) रिचर्ड नेपियर ५) रिचर्ड टेलर ६) फिलिप गिफर्ड ७) रॉबर्ट वार्ड नावाचा एक सर्जन ८) विल्यम मिंघम

या आठ जणांपैकी पहिले सात लोक ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर होते आणि आठव्याला ( विल्यम मिंघम ) या सात जणांनी आपल्या खाजगीतून पगार देऊन कामावर ठेवले होते . शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्दी जौहरच्या कैदेत असताना या महाभागांनी ईस्ट इंडिया कंपनीची परवानगी न घेता इंग्रजी निशाणाखाली गडावर तोफा डागण्याचा जो ‘उद्योग ‘ केला होता त्याचीच शिक्षा म्हणून महाराजांनी या सर्वाना कैद केले होते. यातील रिचर्ड नेपियर हा इंग्लंडहून आला तेव्हाच फार आजारी होता, आणि तो जगेल याची आशा नव्हती. अपेक्षे प्रमाणे तो १० मे १६६१ रोजी मराठयांच्या कैदेत असतानाच मरण पावला. त्यानंतर उरलेल्या कैद्यांना राजापुराहून वासोटा किल्ल्यावर आणि तिथून सोनगड किल्यावर हलवण्यात आले.

ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरत येथील अधिकाऱ्यांनी कैदेतील आपल्या लोकांना सोडावे म्हणून शिवाजी महाराजांना काही पत्र लिहिली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. याच दरम्यान हेन्री रेव्हिंग्टन आजारी पडला. त्यामुळे त्याला रॉबर्ट वार्ड आणि विल्यम मिंघम या दोघांसोबत पॅरोलवर सोडण्यात आले. रेव्हिंग्टन कैदेतून सुटल्यावर या दोघांसोबत सुरत येथे गेला आणि अतिशय आजारी पडल्यामुळे ११ डिसेंबर १६६१ रोजी मरण पावला. बाकीच्या कैद्यांना कालांतराने रायरी ( रायगड ) येथे हलवण्यात आले. या कैद्यांनी रायरी येथून सुरत मधल्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार चालू ठेवला आणि आपली सुटका करण्याविषयी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जरा ‘कडक’ शब्दात सुनावले.

त्यांचे हे खरमरीत पत्र पाहून चिडलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तेवढेच खरमरीत पत्र लिहून या उर्वरित कैद्यांना कळवले की , ” तुम्ही आज तुरुंगात का खितपत पडला आहात ते तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे ! आपला धंदा करायचे सोडून, पन्हाळगडावर इंग्रजी निशाण नेऊन तोफा मारण्याचा फाजील उद्योग तुम्हाला कुणी सांगितला होता ? “असे खरमरीत पत्र लिहून कैदेत पडलेल्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली असली तरी देखील सुरतचे इंग्लिश प्रतिनिधी मंडळ आपल्या देशबांधवांना सोडवण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करीत होते. याच प्रयत्नाचा भाग म्हणून त्यांनी पुढील ‘प्लॅन’ तयार केला.

देशबांधवांना सोडवण्यासाठी इंग्रजांचा प्लॅन !

याच वेळेला विजापूरची राणी बडी साहिबा आपल्या मक्केच्या यात्रेवरून हिंदुस्थानला परतायच्या बेतात होती आणि तिच्या आगमनावर इंग्रज लक्ष ठेऊन होते ! पण कशासाठी ? बड्या साहेबीणीचा आणि रायरी वर अडकून पडलेल्या इंग्रजांचा एकमेकांशी काय संबंध होता ? या दोघांचा काहीही संबंध नसला तरी इंग्रजांना असे वाटत होते की बड्या साहेबिणीला जर आपण पकडले तर आदिलशहा तिच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांवर दबाव आणेल आणि त्या बदल्यात आपल्याला रायरीच्या तुरुंगातील आपल्या देशबांधवांना सोडवून घेता येईल ! वास्तविक पाहता शिवाजी महाराजांवर अशा प्रकारे दबाव टाकून आपल्या देशबांधवांची सुटका करणे इंग्रजांना शक्य नव्हते, परंतु तरी देखील त्यांनी आपल्या योजनेनुसार २१ जुलै १६६२ रोजी झालेल्या मीटिंगमध्ये पुढील ठराव केला:-

रॉयल वेलकम आणि होपवेल या जहाजांच्या कप्तानांसाठीची अधिकारपत्र  (English records on Shivaji मधून )
रॉयल वेलकम आणि होपवेल या जहाजांच्या कप्तानांसाठीची अधिकारपत्र (English records on Shivaji मधून )

“कंपनीच्या नोकरांचा बंदीवास आणि त्यांच्या स्वतःच्या व आमच्या मालकांच्या [म्हणजे कंपनीच्याच] दख्खनमधील मालमत्तेचे झालेले नुकसान या विषयांवर आम्ही विचार केला. शिवाजी आणि दख्खनचा बादशहा [ म्हणजे आदिलशहा ] या दोघांनाही पत्रे लिहून आम्ही कंपनीच्या नोकरांच्या सुटकेकरिता प्रयत्न केला. तरीही ते आता सतरा महिने बंधनात आहेत आणि मोठी खंडणी दिल्यावाचून त्यांच्या सुटकेची आशा नाही. सर्व वाजवी मार्गाचा यापूर्वीच अवलंब करण्यात आला आहे आणि त्यांचा उपयोग झालेला नाही म्हणून त्यांचे स्वातंत्र्य आणि त्यांची व आमच्या मालकांची मालमत्ता बळाने परत मिळवणे योग्य आहे आणि ते आमचे कर्तव्य आहे असे आम्हास न्यायपणे वाटते.

त्याकरिता आम्ही या वेळी जमून आणि विचारविनिमय करून अशा निर्णयाला आलो की त्यांची [ म्हणजे शिवाजी महाराज व आदिलशहा यांची ] जहाजे ती मोख्याहून परत येत असता पकडणे हा त्यांच्या [म्हणजे कैदेत असलेल्या इंग्रजांचा ] सुटकेचा सर्वात परिणामकारक व व्यवहार्य उपाय आहे. कारण उपर्युक्त दोन्ही जहाजे [रॉयल वेलकम व होपवेल ] त्या किनाऱ्यावर असतील अशी आम्हास अपेक्षा आहे. त्याकरिता आम्ही आता दोन तातडीची पत्रे आणि सोबत दोन्ही जहाजांच्या कमांडरांकरिता अशी अधिकारपत्रे पाठवली आहेत की त्यांनी ती मिळताच किंवा हवामान अनुकूल होताच बंदराबाहेर पडावे आणि , दख्खनची राणी [म्हणजे बडी साहेबीण ] मोख्याहून परतताना तिच्यावर छापा घालण्याकरिता , होपवेलने राजापूर व खारेपाटण समोर रहावे आणि रॉयल वेल्कमने वेंगुर्ला , दाभोळ व आसपासच्या बंदरासमोर राहावे. ती [ बडी साहेबीण ] राजापूर येथे उतरेल अशी अपेक्षा आहे. या कामगिरीकरीत त्यांना २० सप्टेंबरची मुदत घातली आहे …. त्यानंतर त्यांनी कारवारला परतायचे आहे.”

रॉयल वेलकम आणि होपवेल या जहाजांच्या कप्तानांसाठीची अधिकारपत्र  (English records on Shivaji मधून )
रॉयल वेलकम आणि होपवेल या जहाजांच्या कप्तानांसाठीची अधिकारपत्र (English records on Shivaji मधून )

याच दिवशी रॉयल वेलकम आणि होपवेल या जहाजांच्या कप्तानांसाठी अधिकारपत्र तयार करण्यात आले. त्याचा आशय पुढीलप्रमाणे होता :-” दख्खनच्या कोणत्याही लोकांची – दख्खनच्या बादशहाची [ म्हणजे आदिलशहाची ] , शिवाजीची किंवा तेथील कोणत्याही व्यापाऱ्यांची जहाजे पकडावीत , दख्खनची राणी [ बडी साहेबीण ] या वर्षी मोखा येथून परत येईल अशी विश्वसनीय माहिती आहे आणि बहुधा ती वेंगुर्ला येथे येईल कारण ती तिथूनच निघाली होती. तिला पकडावे आणि योग्य त्या सन्मानाने वागवावे, पण ती निसटून जाऊ नये अशी दक्षता घ्यावी “या आज्ञेनुसार निदान रॉयल वेलकम या जहाजाने तरी त्या किनाऱ्यावर थोडे दिवस पाळत ठेवली होती, पण दख्खनच्या किनाऱ्यावरील एखादे जहाजाची तिच्या हाती सापडले नाही ! खुद्द बडी साहेबीण ९ सप्टेंबर १६६२ रोजी वेंगुर्ला येथे सुखरूप पोचली !

कालांतराने आदिलशहावर दडपण आणून इंग्रज कैद्यांची सुटका करता येणार नाही हे इंग्रजांच्या लक्षात आले असावे. ही गोष्ट १९ ऑगस्ट १६६२ रोजी सुरतहुन रायरीला कैदेत असलेल्या इंग्रजांना पाठवलेल्या पत्रातून लक्षात येते. कालांतराने १७ जानेवारी १६६३ रोजी या कैद्यांची रायरीच्या तुरुंगातून सुटका झाली आणि ते २९ जानेवारी १६६३ रोजी राजापूर येथे आले !तर हा होता बडी साहेबीणीचे अपहरण करण्याचा इंग्रजांचा धाडसी प्लॅन ! हा प्लॅन यशस्वी झाला असता तर पुढे काय झाले असते याची कल्पना करणे कठीण आहे , परंतु आपल्या देशबांधवांचे मोल या इंग्रजांना केवढे होते हे मात्र यावरून लक्षात येते

संदर्भ :-

१) Shivaji:His Life and Times- G.B.Mehendale

२) श्री राजा शिवछत्रपती – गजानन भास्कर मेहेंदळे

३) English records on Shivaji

लेखन –

सत्येन सुभाष वेलणकर, इतिहास अभ्यासक, पुणे

Post Views: 184
Tags: इंग्रज
Previous Post

रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात सांगितलेले दुर्गविचार – भाग १

Next Post

त्रिंबकजी डेंगळे यांचे उत्तर आयुष्य व इंग्रजांची कैद आणि हालअपेष्टा

Next Post
चुनार किल्ला (1814)

त्रिंबकजी डेंगळे यांचे उत्तर आयुष्य व इंग्रजांची कैद आणि हालअपेष्टा

Comments 3

  1. Maharudra says:
    5 years ago

    Good investigation

    Reply
  2. Anillumar Roy says:
    5 years ago

    Very good historical information. Thanks for giving this interesting document.

    Reply
  3. हर्षल चौधरी says:
    5 years ago

    तुम्ही या लेखात “छत्रपती शिवाजी महाराज हे सिद्दी जौहरच्या कैदेत होते”असा उल्लेख केलाय, तसा न करता तर सिद्दी जौहरने पन्हाळा किल्ल्याला दिलेल्या वेढ्यात अडकून होते, असे लिहायला हवे होते, अशी दुरुस्ती तुम्ही करायला हवी, उगीच “ध” चा “मा” करू नका, वेगळे अर्थ निघतात, व चुकीची माहिती लोकांपर्यंत जाते.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • आम्ही कोण?
  • संपर्क
Contact us - schoolofindianhistory@gmail.com

© 2020 School of Indian History

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • भारताचा इतिहास
    • प्रागैतिहासिक भारत
    • प्राचीन भारत
    • मध्ययुगीन भारत
    • ब्रिटिशकालीन भारत
  • इंग्रजी लेख
  • संपर्क

© 2020 School of Indian History

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In