ब्रिटिश सत्तेविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांचे नंतर काय झालं ?, त्यांना इंग्रजांनी कुठे ठेवलं?, त्यांचे कैदेतील दिवस कसे होते ?, त्यांचा मृत्यू कधी व कसा झाला? या सर्व प्रश्नांचा ससंदर्भ घेतलेला वेध …
3 जून 1818 ला श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी अशीरगडाजवळील ‘धुळकोट’ येथे जनरल माल्कमसमोर शरणागती पत्करली व पेशवाईचा परिणामी मराठेशाहीचा अस्त झाला. शेवटपर्यंत त्रिंबकजींनी पेशव्यांची साथ सोडली नव्हती. त्यावेळी अशीरगडावर असणाऱ्या त्रिंबकजी डेंगळे यांना पकडण्यासाठी कर्नल डोव्हटनने फौज पाठवली. किल्लेदार यशवंतराव लाडांच्या मदतीने त्रिंबकजी अशीरगडावरून पळाले व दक्षिणेत आले. इंग्रजांनी त्रिंबकजींचा शोध सुरू केला व त्याला शोधून देणाऱ्यास इनाम जाहीर केले.
त्रिंबकजी त्याची सासुरवाडी अहिरगाव (ता.निफाड, जि.नाशिक) येथे गुप्तपणे राहत असल्याची खबर अहिरगावचा पाटील जयाजी याने 28 जून 1818 ला मालेगावला इंग्रजांना दिली. त्यावेळी कॅप्टन ब्रिग्ज खानदेशात होता, त्याने कॅप्टन स्वान्स्टनला त्रिंबकजींना पकडण्यासाठी धाडले. स्वान्स्टनच्या नेतृत्वाखालील 800 घोडेस्वारांच्या फौजेने दुसऱ्या दिवशी (29 जून 1818) भल्या सकाळी चांदवड मार्गे अहिरगाव गाठले व त्रिंबकजींना कैद केले. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली. त्यांना प्रारंभी चांदवड व नंतर ठाणे येथील तुरुंगवजा किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले (जिथून ते सप्टेंबर 1816 ला मोठ्या शिताफीने निसटले होते). काही महिने त्रिंबकजी ठाण्याच्या तुरुंगातच होते परंतु तेथूनही त्यांची गुप्तपणे सुटका करण्याची काही कारस्थानं इंग्रज सरकारच्या कानावर आली, त्यामुळे त्यांना मराठी मुलखात ठेवणे धोक्याचे वाटून त्यांना कलकत्त्याला पाठवण्याचे सक्त आदेश कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलने एलफिस्टनला दिले. 5 एप्रिल 1819 ला त्रिंबकजींनी ठाणे सोडले व मुंबईहून त्यांना समुद्रमार्गे बोटीने कलकत्त्याला नेण्यात आले व त्यानंतर त्यांची रवानगी ‘चुनार’च्या किल्ल्यात करण्यात आली.

चुनार किल्ला काशीपासून 30 किमी अंतरावर असून सध्याच्या उत्तरप्रदेश राज्यातील मिर्झापुर जिल्ह्यात आहे. गंगेच्या दक्षिण तीरावर वसलेला हा भारतातील एक पुरातन किल्ला असून तत्कालीन बंगाल प्रांतात असणाऱ्या या किल्ल्याचा वापर इंग्रजांनी अनेक राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी केला होता. 1819 ते 1829 अशी तब्बल दहा वर्षे त्रिंबकजी चुनारच्या किल्ल्यात कैदेत होते. तेथेच त्यांचा 16 ऑक्टोबर 1829 ला दुर्दैवी मृत्यू झाला.
त्रिंबकजींचे चुनारगडावरील कैदेतील जीवन कसे होते यासंबंधीची माहिती बिशप हेबरच्या प्रवासवृत्तात मिळते. कलकत्त्याला बिशप असणारा रेजिनाल्ड हेबर याने 1824-26 दरम्यान भारतदौरा केला होता. काशीहून अलाहाबादला जात असताना तो चुनारगडवर आला होता. तेव्हा त्याने 11 सप्टेंबर 1824 ला त्रिंबकजींची भेट घेतली होती. त्याच्या प्रवासवर्णनातील काही भाग मी मराठीत अनुवादित केला आहे, तो पुढीलप्रमाणे-
त्रिंबकजी राहत असलेल्या ठिकाणचे वर्णन करताना हेबर म्हणतो, ‘चुनार किल्ल्यावरच्या त्या मुुख्य अंतर्गत वर्तुळात आणि अगदी उंच ठिकाणावर दोन अंतर्गत तटबंदी आहेत. ज्यात गव्हर्नर हाऊस, हॉस्पिटल व राज्य कारागृह आहे जेथे सध्या सुप्रसिद्ध मराठा सरदार त्रिंबकजी (डेंगळे) याचे वास्तव्य आहे. ब्रिटिश सत्तेचे दीर्घकाळ कट्टर शत्रू (असलेला) आणि वऱ्हाड, दख्खन व माळवा प्रांतात दंगे भडकवणारा. तो खूप कडक बंदोबस्तात आहे. त्याच्यावर युरोपियन तसेच देशी शिपायांच्या पहारा आहे. पहारेकऱ्यांच्या कधीही त्याला नजरेआड जावू दिले जात नाही. त्याच्या शयनकक्षाला तीन मोठ्या जाळीदार खिडक्या असून त्या व्हरांड्यात उघडतात, जी पहारेकऱ्यांची खोली आहे. इतर बाबतीत त्याला चांगली वागणुक मिळते. दोन मोठ्या व हवेशीर खोल्या एक छोटीशी उंच खोली जिथे त्याचे देवघर आहे आणि पिंपळाच्या सान्निध्यात असलेली छोटीशी बाग. जिथे त्याने खूप चांगल्या प्रकारे बाल्सम (तेरडा) व इतर फुलझाडे लावली आहेत. त्याच्या स्वतःच्या चार नोकरांना त्याच्याजवळ जायला परवानगी आहे, परंतु किल्ला सोडताना आणि परत येताना त्यांची नेहमी झाडाझडती घेण्यात येते आणि रात्री ते तिथे असायलाच हवेत (असा नियम आहे).’

त्रिंबकजीच्या भेटीचे वर्णन करताना हेबर म्हणतो,
‘तो काहीसा बुटका, तरतरीत व चिडचिडा दिसणारा व्यक्ती आहे. जेव्हा मी त्याला पाहिले त्याने मळके सूती धोतर घातलेले असून लाल रंगाची किनार डोक्यावरून व खांद्यावरून निष्काळजीपणाने टाकलेली होती. कर्नल अलेक्झांडरने मला त्याची ओळख करून दिली. तो सभ्यतापूर्वक मला सामोरे गेला. त्याने बंधुभावपूर्वक मला देण्यासाठी काही सुंदर फुले तोडून आणली. त्यानंतर त्याने मला त्याची बाग व देवघर दाखवले आणि काही सामान्य संवादानंतर मी त्याच्यातला एक अनोखा योद्धा अनुभवला जेव्हा तो हसून मला म्हणाला, ‘तुम्हाला माझी ओळख इतरत्र करून द्यायला आनंद झाला असता.’ मी त्याला अभिवादन केले व तेथून निघालो.’
पुढे तो म्हणतो, ‘तो आता, माझ्या मते पाच वर्षांपासून कैदेत आहे आणि आयुष्यभर इथेच राहण्याची शक्यता आहे किंवा त्याचा आश्रयदाता बाजीराव असेपर्यंत. तो त्याच्या सद्यस्थितीसाठी बॉम्बेचे गव्हर्नर एल्फिन्स्टन यांना जबाबदार धरतो. तो म्हणतो, ‘एल्फिन्स्टन माझा सर्वात चांगला मित्र आणि सर्वात वाईट शत्रू आहे.”
त्रिंबकजी डेंगळे विषयी चिंता व्यक्त करताना हेबर म्हणतो,
‘त्याचं जीवन आता उदास, नीरस आणि कंटाळवाणं झालंय. त्याची पूर्ण करमणूक म्हणजे त्याच्या देवाची पूजाअर्चा, बागकाम व नोकरांसोबतच्या गप्पा. हल्ली तो त्याच्या हिशोबात फारच व्यस्त असतो. त्याच्या स्वयंपाक्याने त्याचे तूप चोरल्यामुळे त्याने केवढातरी आरडाओरडा केला होता. काय त्याच्या नशिबाने ही वेळ त्याच्यावर आणली की एक खुनी, दंगेखोर व खोटारडा व्यक्ती म्हणून त्याला आता जगावं लागतंय. मला आशा आहे की मला त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करता येईल.’
कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्रिंबकजींनी स्वकर्तुत्वावर पेशवाईत स्वतः चे वेगळे स्थान निर्माण केले. बाजीरावांचे विश्वासू व पुढे पेशव्यांचे कारभारी बनले. मराठेशाहीच्या उत्तरार्धात त्यांनी शिंदे, होळकर, भोसले, पेंढारी इ.ना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्रिंबकजींचं वाढतं वर्चस्व इंग्रजांना असह्य होऊ लागलं. गंगाधरशास्त्री खूणप्रकरणाशी त्यांचा संबंध जोडून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. ठाण्याच्या तुरुंगातून पलायन केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी भिल्ल, रामोशी इ. ना संघटित केले व इंग्रजांविरुद्ध उठाव केले. मोठ्या फौजेनिशी पेशव्यांना मिळून 1817-18 च्या इंग्रज-मराठा लढायांत पराक्रम गाजवला. आष्टीच्या लढाईनंतर अनेक मराठी सरदारांनी पेशव्यांची साथ सोडून दिली. अशावेळी निष्ठावंत त्रिंबकजी अखेरपर्यंत पेशव्यांसोबत होते. धुळकोटला नाईलाजाने पेशव्यांना इंग्रजांसमोर शरणागती पत्करावी लागली व बापू गोखलेंनी 5 नोव्हेंबर 1817 ला ब्रिटिश रेसिडेंसीवर हल्ला करून सुरू केलेला हा दीर्घकाळापर्यंत चाललेला संघर्ष समाप्त झाला.

इंग्रजांनी ‘त्रिंबकजींना आम्ही केवळ जीवदान देऊ शकतो’ असे सांगितले. पेशव्यांनी ब्रम्हावर्ताची वाट धरली. इतर अनेक मराठमंडळींच्या जहागिऱ्यांना इंग्रजांनी अभय दिले, सरंजाम कायम ठेवले. मात्र आयुष्यभर त्रिंबकजींना येथून हजार किलोमीटर दूर चुनारच्या किल्ल्यावर कारावासात राहावं लागलं. शिवछत्रपतीस्थापित मराठी राज्य वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या त्रिंबकजींचा संघर्ष इतिहासाच्या पडद्याआड राहिला ही खरोखरचं मोठी शोकांतिका आहे.
त्रिंबकजींचा मृत्यू कसा झाला?
मृत्यूपूर्वी त्रिंबकजींना दुर्धर आजारांनी ग्रासले होते. त्यांनी कलकत्त्याला गव्हर्नर जनरलकडे विनंती केली होती की मला येथून काशीला जावू द्यावे. तिथे मरण आल्यास मोक्ष मिळतो असे आमच्या धर्मात म्हणतात, परंतु ती याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी 16 ऑक्टोबर 1829 ला चुनारगडावर त्रिंबकजींचा मृत्यू झाला.
संदर्भ-
1. History of Mahrattas – James Grant Duff
2. Bajirao ll and the East India Company – Pratul Chandra Gupta
3. The Asiatic Journal & Monthly register for british and foreign India, China and Austrelia -1835
4. Narrative of a Journey through the Uppar Provinces of India from Culcutta to Bombay (1824-25) – Bishop Reginald Heber
लेखन –
सुमित अनिल डेंगळे

Great information
Thanks
ही पोस्ट आपल्या नावासह शेअर करू काय,संदर्भ म्हणून वापर करू शकतो काय?
जरूर वापरा..!