भारतात युरोपीय सत्ता आल्या त्या १५व्या शतकात. युरोपियन लोकांना भारत म्हणजे कच्चा मालाचा पुरवठा करणारा देश आहे हे जाणवले त्यामुळे पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज अशा सर्वांनी आपल्या आरमाराच्या जोरावर भारतातील काही भागात सत्ता मिळवली. इंग्रज हे जास्त हुशार असल्याने त्यांचा सत्ताविस्तार भारतात जास्त झाला. सुरुवातीस केवळ व्यापार हेच ध्येय असलेल्या इंग्रजांनी येथील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन हळूहळू पण योजनापूर्वक पद्धतीने भारतात आपला राजकीय विस्तार केला.
मराठ्यांना इंग्रजांची ही विस्तारवादी नीती हे समजून चुकली होती. रामचंद्रपंत अमात्य या टोपीकर इंग्रज सावकारांशी कसे वागायचे याचा वस्तुपाठ त्यांच्या आज्ञापत्र या ग्रंथात घालून देतात.
“हे टोपीकर वरकड साहुकार नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक देशात राज्यच करत आहेत. त्यांचेच हुकुमाने हे लोक येथे येतात. राज्य करणाऱ्यास स्थल लोभ नाही हे काय घडो पाहते? त्यात ही जात हट्टी. हातास आले स्थल मेल्यानेही सोडायचे नाहीत. त्यांची आमदरफती ते आले गेले एवढीच असो द्यावी”, हे अमात्यांचे विचार इंग्रजांच्याबद्दल सगळे काही सांगून जातात.
रामचंद्रपंत अमात्य
पानिपतच्या युद्धानंतर इंग्रजांचाच पुणे दरबारात प्रवेश झाला. मराठ्यांची सत्ता त्यावेळी नाजूक होती इंग्रजांचा वकील पुणे दरबारात कायम असावा ही मागणी माधवराव पेशव्यांना मानवी लागली. सन १७७४ पासून इंग्रजांनी उघडपणे साम्राज्यवादी धोरण स्वीकारले आणि भारतातील भूभाग जिंकून घेण्यास सुरुवात केली.
बारभाई मंडळाचा नेता या न्यायाने नाना फडणीस यांनी इंग्रजांची दखल घेतली. नाना फडणीस हे इंग्रजांना व इंग्रज त्यांना पक्के ओळखून होते. आरमारी सत्ता वापरून मुंबई नष्ट करावी अशी मागणी ते आंग्रे व धुळप यांच्याकडे करत होते परंतु ते काही शक्य झाले नाही त्यामुळे त्यांनी मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली. “पाऊण लाख रुपये सरकारात देतो पण आम्हास व्यापाराची परवानगी द्यावी” अशी विनंती इंग्रजांना करावी लागली.
“संबंधाखेरीज समजून येत नाहीत. कौल करार त्यांचे गावीच नाहीत. प्रथम लिहिणे बोलणे परम गोड. दुसऱ्यास असे वाटावे की इमाम वाचन काय ते यांचेच पाशी. खरेपणाची रासच ऐसी भूलथापी पडावी पण परिणामी उगवते. त्यांची नजर केवळ वाकडी. सर्व मुलुक काबीज केला. येकास मेलऊन घ्यावे. एकास हलके करावे फोडाफोड करावी हे जात यांच्या करण्याची. त्यांचा गरुर उतरला खेरीज दक्षिणचा दाब व बंदोबस्त दोन्ही नाहीत.” असे नाना फडणीस आपल्या पत्रातून म्हणतात.
अर्थात इंग्रज फक्त नाना फडणीस यांना कळले होते असे नाही. अहिल्यादेवी होळकर, महादजी शिंदे, राघोबा, आनंदीबाई सखारामबापू यांच्यापासून अगदी हैदर आणि टिपू यांना सुद्धा इंग्रजांचा हा स्वभाव माहिती होता. एवढे असून सुद्धा आपल्या दुर्दैवाने मराठ्यांचे राज्य इंग्रजांच्या ताब्यात गेले.
